Tuesday, May 19, 2020

कोरोना मुळे शिक्षण क्षेत्रात येऊ घातलेले बदल: एक निरीक्षण


कोरोना मुळे शिक्षण क्षेत्रात येऊ घातलेले बदल: एक निरीक्षण


 कोरोना नंतर च्या काळामध्ये आपल्या शिक्षण प्रणाली मध्ये काळाशी सुसंगत असे भरपूर बदल येऊ घातले आहेत असे वाटते रोन मुळे आपल्यावर लादल्या गेलेल्या या टाळेबंदी च्या काळामध्ये आलेल्या अनुभवावरून मला काही निरीक्षणे नोंदवावीशी वाटतात .

१.              या काळामध्ये अनेक स्तरावर अनेक महाविद्यालये, विद्यापीठे आणि विभागांकडून  विविध विषयावर वेबिनारचे आणि विकास कार्यक्रमांचे  यशस्वी  आयोजन केले गेले .  यानिमित्तानं अनेक विषयांतील तज्ज्ञांचे विचार ऐकण्याची संधी घरबसल्या प्राप्त झाली.  सर्वच आयोजकांकडून नवनवीन विषयांवर वेबिनार घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला गेला.  काही  वेबिनारमध्ये तर हजरोनी आपला सहभाग  नोंदवला. अनेक प्राध्यापक ग्रंथपालांनी विविध वेबिनार मध्ये सक्रिय सहभाग घेऊन आपापल्या विषयातील नवीन प्रवाह आणि तंत्रज्ञानाचे  ज्ञान घेतले.  असे असले तरी काही वेळा या प्रकारची नोंदणी ज्ञान घेण्यासाठी होती की फक्त उपस्थितीचे प्रमाण पत्र  मिळवण्यासाठी होती यािषयी शंका निर्माण होण्यासारखी स्थिती होती .
  
२.              कोणत्याही पातळीवरील शिक्षण ही अत्यावश्यक बाब नाही हे या निमित्ताने अधोरेखित झाले. टाळेबंदी उठल्या नंतरही शाळा महाविद्यालये कधी नियमित सुरू होतील याचा कुणालाच अंदाज येत नाही. आणि शाळा-महाविद्यालये जरी सुरू झाली तरीही पालक आपल्या पाल्यांना शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रत्येक्ष शिक्षण घेण्यासाठी पाठवायला धजावतील असे वाटत नाही. निदान सुरुवातीच्या काळात तरी त्यांच्या मनामध्ये भीती असेल असे वाटते .

३.               महाविद्यालयामध्ये 120 विद्यार्थ्यांच्या वर्गांना पूर्वीप्रमाणे शिकवायला मिळणे  हे बहुतेक दुरापास्त दिसते आहे. किंवा वर्गामध्ये 120 विद्यार्थी उपस्थित राहतील याविषयी मनात शंका आहे.  आणि म्हणून एकंदरच शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल घडून येईल किंवा आणावा लागेल असे दिसतेय.

४.              ताळेबंदी च्या या  काळामध्ये मी स्वत: काही वेबिनारमध्ये सहभागी झालो होतो. काही  ठिकाणी वेबिनार मध्ये साधन व्यक्ती म्हणून व्याख्यानेही दिली त्याबरोबरच मुंबई विद्यापीठाच्या आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ग्रंथालय आणि माहितीशास्त्र च्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन केले . यामध्ये प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली , ती म्हणजे  पारंपारिक शिक्षण पद्धतीमध्ये वर्गात जाऊन शिकवण्या पेक्षाही अशा पद्धतीने ऑनलाईन व्याख्याने देणे हे परिणाम कारक असले तरीही त्यासाठी भरपूर तयारी करण्याची आवश्यकता असते. आणि म्हणून आपण ज्या विषयांमध्ये व्याख्यान देणार आहोत त्याची भरपूर आणि चौफेर तयारी करावी लागते किंवा भविष्यात तयारी करावी लागेल असे वाटते.

५.               वर्षानुवर्ष कधीकाळी काढलेल्या टिपणावरून शिकवण्याची पद्धत  आपोआपच मोडीत निघेल.


६.               ऑनलाइन पद्धतीमधून आपल्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतरही लोक आपली व्याख्याने पाहू शकतात ऐकू शकतात त्याची समीक्षा होऊ शकते म्हणून अभ्यासोनी प्रकटावे लागेल.

७.               यापुढे फक्त शिक्षण घेऊन नोकरी मिळेपर्यंत विद्यार्थी न राहता आपण जो विषय  शिकवणार आहोत त्या विषयाचे आयुष्यभर विद्यार्थी राहण्याची कला जोपासावी लागेल.


८.               आपल्या विषयाचे अध्ययन व ज्ञान मिळण्याबरोबरच माहिती आणि तंत्रज्ञानाचा  परिणामकारक वापर अध्ययन आणि अध्यापनात  करण्याच्या दृष्टीने  सर्वच शिक्षकांना हे तंत्रज्ञान समजून घेऊन आत्मसात करावे लागेल. ऑनलाइन पध्दतीमध्ये अभ्यासक्रमाप्रमाणेच शिकवून विद्यार्थ्यांना संदर्भ ग्रंथांची आणि ऑनलाईन/ऑफलाईन साधनांची यादी द्यावी लागेल.

९.              ऑनलाईन पद्धत यशस्वी झालीच तर अशा सर्व व्याख्यानांचा संग्रह  महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून घ्यावा लागेल . विद्यार्थी त्यांना हवे तेव्हा व्याख्याने ऐकू शकतील. आणि असे झालेच तर काही काळानंतर उपस्थिती ची अट सुद्धा शिथिल होऊ शकते. विशेषतः सामाजिक शास्त्रे आणि मानव्यव्यविद्या शाखांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेश घेतील का अशीही शंका येते.  दूरशिक्षण माध्यमातून  अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी प्रवेश घेऊ शकतील.

१०.          या पार्श्वभूमीवर अनेक विद्यापीठांनी आपला दूर शिक्षण विभाग हा सशक्त करून  शैक्षणिक साधन निर्मितीचे काम सुरू आहे .

११.          शिक्षणासाठी म्हणून परदेशी जाण्याचे प्रमाण सुद्धा ऑनलाइन पद्धतीमुळे कमी होऊ शकेल आणि परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये भारतात ाहूनच प्रवेश घेऊन शिक्षण घेणे शक्य होईल. आणि असे झाले तर भारतीय विद्यापीठांना आणि एकंदर शिक्षणपद्धतीला  परदेशी विद्यापीठांचा दर्जाच्या पातळीवर सामना करावा लागेल.

१२.           सध्या अनेक परदेशी विद्यापीठांनी आपले विविध अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने जागतिक पातळीवर सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहे. सध्या तरी हे अनेक अभ्यासक्रम फक्त पदविका आणि प्रमाणपत्र पातळीवरच उपलब्ध करून दिलेले . पण  भविष्यात संपूर्ण पदवी अभ्यासक्रम सुद्धा अशा पद्धतीने उपलब्ध होऊ शकतात.

१३.          भारतात सुद्धा स्वयम् च्या माध्यमातून अशा प्रकारचे 500 पेक्षा अधिक अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत .  अभ्यासक्रमांसाठी अतिशय चांगल्या प्रकारची शैक्षणिक साधन निर्मिती करण्यात आलेली आहे. हे अभ्यासक्रम सामाजिक शास्त्र मानव्यविद्या, विज्ञान , माहिती तंत्रज्ञान आणि इतर शाखांमधील विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहेत.  https://spoken-tutorial.org सारखे सशक्त माध्यमांमुळे या प्रकारचे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरत आहेत.  आय आय टी सारख्या अनेक संस्थानी या प्रकारच्या अभ्यासक्रमाचा   विकास करण्यासाठी आपला सक्रिय  सहभाग नोंदवला आहे.  साईड बाय साईड लर्निंग तंत्रज्ञामुळे या प्रकारच्या   अभ्यासक्रमांना निश्चितच चालना मिळणार आहे.  मी स्वतः आय आय टी मुंबईने विकसित केलेल्या बारा बारा आठवड्यांच्या एका अभ्यासक्रमासाठी  स्वयंम  च्या माध्यमातून प्रवेश घेतला आहे.  या अभ्यासक्रमासाठी तयार केलेल्या काही tutorials  पाहल्यानंतर आशा प्रकारचे  अभ्यासक्रम भविष्यात निश्चितच विद्यार्थ्यांना आकर्षित करतील अशी माझी खात्री पटली आहे.
लिहिण्यासारखे बरेच आहे पण मला फक्त इतकेच सांगावेसे वाटते की येणार्‍या काळामध्ये शिक्षण संस्थांनाच नव्हे तर शिक्षकांनाही आपला दर्जा सुधारावा लागेल आणि तो टिकवावा लागेल  आणि त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नरत राहावे लागेल.  नाहीतर ‘perform or perish’ या उक्तीचा अनुभव मिळू शकेल. यापुढे शिक्षण क्षेत्रांत सुद्धा survival of fittest प्रत्यक्षात येण्याची नांदी यानिमित्ताने सुरू झाली आहे असे वाटते.

नारायण बारसे
ग्रंथपाल,
विद्या प्रसारक मंडळाचे
जोशी बेडेकर महाविद्यालय, ठाणे