Monday, May 18, 2020

निमित्त: जागतिक ग्रंथ दिन


निमित्त: जागतिक ग्रंथ दिन
नारायण बारसे
ग्रंथपाल, जोशी-बेडेकर महाविद्यालय, ठाणे

२३ एप्रिल, इंग्रजी भाषेतला महान कवी आणि नाटककार शेक्सपिअर  यांचा जन्म दिवस आणि मृत्यु दिन.  हा दिवस जागतिक ग्रंथ दिन म्हणून साजरा केला जातो. जगभर एखाद्या सणासारखा आठवडाभर हा सोहळा प्रतिवर्षी  साजरा होत असतो . भारतात मात्र  तेवढ्या धूमधडाक्यात हा दिवस साजरा होत नाही. या वर्षी जागतिक  पातळीवर उद्भवलेल्या कोरोना विषाणूच्या भीतीच्या सावटाखाली हा जागतिक ग्रंथ दिन साजरा करावा लागत आहे.  कोरोनाच्या भीतीने  संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. जगातील कुठल्याही देशाला आपल्या सामर्थ्याने पराभूत करू शकतील आशा देशांना सुद्धा जीवनावश्यक औषधे मिळवण्यासाठी भारतासारख्या देशाकडे हात पसरण्याची वेळ आली आहे.  एवढ्या भीषण आपत्तीतून संपूर्ण जग जात आहे. जगातील जवळजवळ सर्वच देशांत कोरोना पसरला आहे.  जगभर 25 लाखापेक्षाही अधिक कोरोनाग्रस्त असल्याची नोंद झाली आहे . तर कोरोना विषाणूची लागण झाल्याने आजपर्यंत 170000 लोकांनी आपला जीव गमावला आहे.  आपल्या देशातही टाळेबंदी लागू असल्यामुळे सर्व नागरिक आपापल्या घरात अडकून पडलेले आहेत. अशा परिस्थितीत काय करावे असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. सुरुवातीचे काही दिवस सुट्टीचा आनंद घेण्यात गेले. परंतु नंतर हळूहळू संकटाचे गांभीर्य लक्षात येत गेले आणि आपण सर्वजण भानावर आलो. मोबाईल आणि व्हाट्सउप च्या माध्यमातून कोरोनाविषयी बरीच चुकीची माहिती ,विनोद आणि  गैरसमज आपल्यापर्यंत पोहोचत होते. सुरुवातीच्या काळात कोरोना आपल्यापासून खूप दूर आहे आणि आपण एकदम सुरक्षित आहोत अश्या अविर्भावात काही दिवस गेले. परंतु जसजसा करोना आपल्या राज्यात, जिल्ह्यात, शहरात आणि आपल्या संकुलातजवळ आणि संकुलात  पोहोचल्याच्या बातम्या येऊ लागल्या तेव्हा मात्र सर्वत्र अस्वस्थता पसरण्यास सुरवात झाली. ऱ्याच निकटवर्तीयांबरोबर चर्चा सुरू असताना असे लक्षात आले की सकाळ संध्याकाळ कोरोनाबद्दलच्या बातम्या पाहून सगळेच मानसिक तणाव अनुभवू लागले आहेत. दूरचित्रवाणी वरील कोणत्याही कार्यक्रमात मन रमेनासे झाले.  जून्या लोकप्रिय मालिकाचे पुनरप्रसारण सर्वच वाहिन्यांवर सुरू झाले.  वीन मालिकांचे चित्रीकरण बंद असल्याने वाहिन्यांपुढेही प्रश्न उभे राहिले. अनेक  वाहिन्यांवरील बातम्या अंगावर येणाऱ्या आणि  नकोशा वाटायला लागल्या. तळेबंदीमुळे दररोजची वर्तमानत्रे पण येणे बंद झाले. पर्याय म्हणून वर्तमानपात्रांच्या ऑनलाईन आवृत्त्या  येऊ लागल्या. यानिमित्ताने या सर्वच माध्यमांच्या  मर्यादाही  स्पष्टपणे जाणवल्या. यावर उपाय म्हणून काही उपक्रम हाती घेतले जाऊ लागले,. शैक्षणिक क्षेत्रात असलेल्यांनी ऑनलाईन व्याख्याने घेणे वेबिनार ला हजेरी लावणे सुरू केले. काहीनी आपल्या विषयाशी संबंधित लिखाण हाती घेतले. काही जण वाचनाकडे वळू लागले पण सर्वांकडेच ग्रंथ आणि इतर वाचनसाहित्य उपलब्ध नसल्याने त्यांच्यासमोर अडचणी उभ्या उभ्या राहिल्या. काही जणांनी व्हॉट्सअॅपवर एकमेकांना  पुस्तकांच्या पीडीएफ पाठवल्या. त्यावरही काहींनी आपला आक्षेप नोंदवला, कारण कॉपीराईट. तरीही अनेक ग्रंथांच्या पीडीएफ स्वरूपातील आवृत्याचें ऑनलाईन देवाणघेवाण होतच राहिले.  असे असले तरी हे प्रयत्न सर्वांच्याच वाचनाभिरुचीची ृष्णा भागवणारे  निश्चितच नव्हते. प्रत्येकाची वाचनाची आवड-निवड वेगळी असते. अशाच पेच प्रसंगाला आपणही सर्वच सामोरे जात आहोत .
पूर्वी वाचन साहित्यामध्ये  म्हणजे ग्रंथ आणि नियतकालिकाचा प्रामुख्याने समावेश होत  असे परंतु आधुनिक युगात मुद्रित साधनांबरोबरच अमुद्रित, इलेक्ट्रॉनिक, अंकीय(Digital), ऑनलाईन/ऑफलाईन माहिती संग्रह(Database) यांचा वापर मोठ्या प्रमाणात औपचारिक शिक्षणात विद्यार्थी आणि संशोधक करीत असतात. इंटरनेटच्या माध्यमातून माहिती मिळविण्याकडे जास्त कल दिसून येतो. त्यातही बरेचसे संदर्भ आणि स्त्रोत गुगलच्या माध्यमातून प्राप्त केले जातात. परंतु ऑनलाईन आणि मुक्त माहिती संग्रहातून मिळवलेल्या माहितीची सत्यता आणि अधिकृतता तपासली जातेच असे नाही. सध्याच्या पिढीला सर्व तत्काळ हवे असते त्यामुळे गुगलचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. गुगलचे शोध धोरण तंत्रे सुद्धा पूर्ण क्षमतेने वापरण्याचे कौशल्य आत्मसात न करताच मिळेल ती माहिती वापरून आपले काम उरकले जाते.
आजच्या तरुण पिढीच्या, विशेषतः विद्यार्थ्यांच्या बाबतीत असे म्हटले जाते की भ्रमणध्वनी  हेच त्यांच्या शिक्षणाचे आणि करमणुकीचे साधन आहे.  बऱ्याचदा मोबाइल गेम मूळे  मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत  होत असल्याची निरीक्षने देखील नोंदवली जात  आहेत. भ्रमणध्वनी  आणि इंटरनेट च्या आधीच्या काळात ग्रंथ वाचन हे  शिक्षण आणि करमणुकीचे महत्त्वाचे साधन असत. अनेक घरांमध्ये वडीलधार्‍यां  मंडळी सोबतच घरातील लहान मुलांची वाचना अभिरुची विकसित होत असत . परंतु अलीकडच्या काळात सगळी कडे अशी ओरड आहे कि, माध्यमांच्या आक्रमणांमुळे, विशेषतः दूरदर्शन, मोबाईल आणि इंटरनेटमुळे तरुण पिढीचा वाचनाचा ओढा कमी झाला आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, युटूब, ट्विटर, व्हाटसअप व तत्सम समाजमाध्यमांच्या प्रलोभानांमुळे तरुण पिढीचे वाचन कमी झाले आहे असेही बोलले जाते. असे असले तरी माझा ग्रंथपाल म्हणून मा‍झ्या २७ वर्षांच्या काळात  मला येत असलेला  अनुभव मात्र थोडासा वेगळा आहे. म्हणून खालील सकारात्मक निरीक्षणं नोंदवावीशी वाटतात .

सात हजार विद्यार्थी संख्या असलेल्या आमच्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या सर्व विभागात मिळून भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांची दररोजची सरासरी संख्या पंधराशेच्या आसपास आहे. परीक्षांच्या काळात ग्रंथालयाचे सर्व विभाग पूर्णक्षमतेने भरलेले असतात. महाविद्यालयाच्या संदर्भ आणि नियतकालिक विभागात कायमच विद्यार्थ्यांची वर्दळ असते. अनेक विद्यार्थी या विभागातील संदर्भ सेवेचा आवर्जून लाभ घेतात. वर्गात शिकताना न समजलेल्या संकल्पनांची उकल करण्यासाठी या विभागातील ज्ञानकोश, विश्वकोश, शब्दकोश, चरित्रात्मक संदर्भ साधने, भौगोलिक संदर्भ साधने, हँडबुक, मँन्युअल, वार्षिके, स्थलवर्णनकोश, प्रवासी मार्गदर्शिका, इत्यादींचा उपयोग विद्यार्थी अनेकवेळा करताना दिसतात. ग्रंथालयात सर्व विभागात मुक्तप्रवेश असल्याने ग्रंथ आणि वाचक, विद्यार्थी यांच्यामध्ये कोणताही अडथळा नसतो आणि विद्यार्थी तासंतास याविभागात अभ्यासा बरोबरच अभ्यासक्रमांबाहेरील शंकांचे समाधान संदर्भ ग्रंथांमध्ये शोधताना आढळतात. खूपवेळा त्यांना हवी असलेली माहिती मिळवून देण्यास मदत केली तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सहजासहजी टिपता येतो आणि जाताना ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या सहकार्याची पावती म्हणून आभाराचे शब्द नक्की मिळतात. दरवर्षीचा अनुभव तर असा आहे कि, काही विद्यार्थी पास झाल्यानंतर ग्रंथालयाला आवर्जून भेट देऊन तोंड गोड करून जातात. बऱ्याचवेळा असेही म्हटले जाते कि, आत्ताचे तरुण अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचन करीत नाही पण हे सुद्धा खरे नाही. नियमितपणे ग्रंथालयात येऊन अवांतर वाचनासाठी ग्रंथांची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. यामध्ये, कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, प्रवासवर्णने, पौराणिक कथांवर आधारित साहित्य, परराष्ट्र संबंध, व्यक्तिमत्व विकास, राजकीय आणि सांस्कृतिक माहितीपूर्ण ग्रंथ वाचण्याकडे कल दिसून येतो. अनेक विद्यार्थी वाचनावर आधारित  ब्लॉग लेखन वाचन करतात . विद्यार्थ्यांमध्ये  वाचनाची गोडी निर्माण करण्याचा वसा घेतलेल्या आणि ‘बुकलेट गाय’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमृत देशमुख या तरुणाचे लाखो विद्यार्थी चाहते आहेत .   विद्यार्थीच मित्रांना ग्रंथाची माहिती देऊन वाचनाची रुचि निर्माण करताना मी पाहीले आहे. आपणास आवडलेला ग्रंथ परत करायला येतानाच मित्र किंवा मैत्रिणीला सोबत घेवून येवून तोच ग्रंथ त्याच्या नावावर घेण्यास सांगून वाचण्याचा आग्रह धरणारे विद्यार्थी सुद्धा दिसून येतात.
महाविद्यालयीन युवक मोबाइलमधे  मग्न राहून वेळ वाया घालवतात हा हि एक गैरसमज आहे, असे मला माझ्या निरीक्षणातून दिसून आले आणि म्हणूनच त्यांच्या वाचन अभिरुचीची मुद्दाम नोंद घ्यावीसी वाटते. आजच्या पिढीच्या वाचकप्रिय लेखकांमध्ये चेतन भगत, अमिष त्रिपाठी, देवदत्त पटनायक, शशी थरूर, सुदीप नगरकर, रॉबिन शर्मा, सावि शर्मा, शेखर कपूर, कविता काणे, शिव खेरा, एकनाथ ईश्वरन, स्टीव्हन कोव्हे, सुधा मुर्ती, ए.पी.जे.अब्दुल कलाम, विवेकानंद, आनंद निळकंठन, एस. एल. भैरप्पा, अश्विनी संघी, गिरीश कुबेर, ही काही प्रातिनिधिक नावे आहेत. तरुणाईमध्ये कायम चर्चेत असलेल्या लेखकांचे पौराणिक कथांवर लिहिलेले साहित्य जग, आणि भारताचा इतिहास, संस्कृती, अर्थ, आणि तरुणांचे भावविश्व रेखाटणाऱ्या साहित्याची मागणी ग्रंथालयात नेहमीच केली जाते. बरेच विद्यार्थी फ्लीपकार्ट, अमेझॉन, सारख्या साईटच्या माध्यमातून अनेकदा ग्रंथ खरेदी करतात. आपल्या आवडत्या लेखकाचे पुस्तक प्रकाशनाच्या पहिल्याच दिवशी त्या लेखक/लेखिकेच्या सहीनिशी आपल्या हाती पडावे अशापद्धतीने प्रकाशनपूर्व मागणी विद्यार्थी नोंदवितात. काही लेखकांची पुस्तके वाचली आहेत आणि संग्रही देखील आहेत असे सांगणाऱ्या तरुणांची संख्या सुद्धा मोठी आहे.
          पुस्तकांबरोबरच नियतकालिक/संदर्भ विभागात बसून नव-अनुष्टूभ, मुक्तछंद, भाषा आणि जीवन, साधना, ललित, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, इ.पि.डब्लू, फ्रंटलाईन, इंडिया टूडे, इंडिअन लिटरेचर, ओपन, कोम्पिटेशन सक्सेस रिव्ह्यूव, इत्यादी नियतकालिके नियमितपणे वाचणारे विद्यार्थी थोड्याप्रमाणात का असेनात पण ग्रंथालयात नेहमीच दिसतात. यापैकी काही विद्यार्थी तर महाविद्दयालयात तरुणाईला आकर्षित असलेले कार्यक्रम सुरु असताना सुद्धा ग्रंथालयात मग्न असतात. वृत्तपत्रांच्या साप्ताहिक पुरवणीतील माहिती वाचून ग्रंथालयात नवीन ग्रंथांची मागणी नोंदवणारे, विविध स्पर्धांसाठी पूरक वाचनासाठी पुस्तकांची मागणी करणारे, विद्यार्थी वाचक नेहमीच ग्रंथालयाला अद्यावत राहण्यास मदत करतात. किन्डल सारखे ग्रंथवाचानासाठीच असलेले गॅझेट देखील विद्यार्थ्यांच्या हातात दिसू लागले आहे. एक लाखापेक्षाही अधिक विविध भाषा आणि विषयांची पुस्तके खिशात घेवून फिरण्याची श्रीमंती देणारे किन्डल म्हणजे ग्रंथव्यवहारातला आणि एकूणच वाचन अभिरुची विकसित करणारा एक चमत्कारच म्हणावा लागेल. पाच ते पंधरा हजारांमध्ये उपलब्ध असलेल्या या गैझेट लोकप्रियतेची नोंद घेवून अनेक प्रकाशकांनी आपल्या ग्रंथाच्या किन्डल आवृत्या बाजारात आणल्या आहेत. आणि या मुद्रित आवृत्तीपेक्षा तुलनेने स्वस्त सुद्धा असतात. किन्डलचे आजून महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे थ्री जी, वाय फाय आणि त्याचप्रमाणे रात्री आणि दिवसा देखील डोळ्यांना त्रास न होता ग्रंथासारखे वाचण्याची सुविधा होय. थ्री जी आवृत्तीमध्ये कोणत्याही मोबाईल नेटवर्कच्या सेवा न घेता जगभरात आपण कोठेही असलो तरी ग्रंथ डाऊनलोड करता येतात. किन्डलचे मोबाईल अॅप्प सुद्धा आहे परंतु किन्डल बुक रीडर एवढे ते लोकप्रिय होऊ शकले नाही.
         आमच्या महाविद्यालयात अलीकडच्या काळात अंध विद्यार्थ्यांची संख्या बऱ्यार्पैकी वाढते आहे. पूर्वी एखाद दुसरा अंध विद्यार्थी असायचा आता मात्र पाच-दहा विद्यार्थी विविध वर्गात दरवर्षी प्रवेश घेतात. हि संख्या या अर्थाने सुखावणारी आहे की, अंध विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाला प्रवेश घेण्याचे प्रमाण वाढत आहे. आमच्याकडे असणारे हे सर्वच विद्यार्थी अतिशय चौकस आहेत. शुभम पाटील नावाच्या विद्यार्थ्याने माझ्याकडे पाठपुरावा करून डॉ. विजय बेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याच्या सावि फाउंडेशनच्या रश्मी पांढरे यांच्या सहकार्याने ब्रेल विभाग ग्रंथालयात सुरु करण्यात सहभाग घेतला. सध्या या विभागात दोनशेच्यावर विविध विषयावरील पुस्तके उपलब्ध आहेत. अंध विद्यार्थ्यांना ब्रेल ग्रंथाबरोबरच  आणि इतरांच्या मदतीने ग्रंथालयातील इतर वाचनसाहित्याचा लाभ घेतायावा यासाठी ग्रंथालयात जागा कायमस्वरूपी आरक्षित केली आहे. या विद्यार्थ्यांना स्वतःच्या नोट्स काढता याव्यात यासाठी एक ब्रेलर(ब्रेल टाईपराईटर) देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. या मुलांची वाचनाची भूक भागवण्यासाठी आणि नवीन माहिती त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी त्यांना दोन संगणक उपलब्ध करून दिले आहेत व त्यावर “एन. व्ही. डी. ए.” नावाचे मुक्त प्रणाली संगणक वाचन सहाय्यक स्थापित केले आहे. आणि हे विद्यार्थी सर्वसामान्य विद्यार्थ्यासारखे इंटरनेट आणि माहिती संप्रेषण तंत्रज्ञान सापेक्ष माहिती वाचतात/ऐकतात. विशेष म्हणजे या क्षेत्रात नवीन येणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती त्यांच्याकडे असते.
असाध्य ते साध्य। करीता सायास। कारण अभ्यास। तुका म्हणे।
या ओळीप्रमाणे या विद्यार्थ्यांचे प्रयत्न प्रशंसनीय वाटतात.
श्री. स्वागत थोरात संपादित रिलायन्स दृष्टी नावाचे ब्रेल नियतकालिक हि मुले नियमितपणे वाचतात. यापैकी काही विद्यार्थी महाविद्यालयात आणि इतर ठिकाणी होणाऱ्या साहित्य विषयक स्पर्धामध्ये भाग घेतात व बक्षिसेही मिळवतात. अलीकडेच या विद्यार्थ्यांच्या चमूने आकाशवाणी वरील कार्यक्रमात भाग घेतला त्याची संपूर्ण तयारी मात्र ग्रंथालयात बसून केली. एकंदरीतच, वाचन आणि अद्यावत माहितीसाठीची या विद्यार्थ्यांची धडपड मला ग्रंथपाल म्हणून प्रेरणा देवून जाते. आणि नेहमीच काही नवीन उपक्रम करण्याची उर्जा त्यांच्याकडून मिळते.
 फ्रान्सिस बेकन हा प्रख्यात लेखक म्हणतो...
Reading makes a full man; Conference a ready man; And writing an exact man
हाच विचार भारतीय परंपरेत समर्थ रामदासांनी वेगळ्या पद्धतीने मांडला...
“दिसामाजी काहीतरी लिहावे ll
प्रसंगी अखंडित वाचीत जावे ll
                                  
नारायण बारसे
विद्या प्रसारक मंडळाचे जोशी-बेडेकर कॉलेज, ठाणे
२१ / ०४ /२०२०
 

No comments:

Post a Comment