Monday, May 18, 2020

तीन दिवस 450 किलोमीटर अंतर: एक समृद्ध करणारा सायकल सफरीचा अनुभव


तीन दिवस 450 किलोमीटर अंतर: एक समृद्ध करणारा सायकल सफरीचा अनुभव

प्रा. नारायण बारसे, ठाणे


बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी (शिवजयंती) ते शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारी (महाशिवरात्री) 2020 असे तीन दिवस माझे सायकल मित्र श्री मिलिंद गोगटे यांच्यासह  ठाणे-सिन्नर-कोपरगाव-शिर्डी-येवला-मनमाड-कुंदलगाव-मालेगाव- चांदवड- नाशिक-ठाणे असे पूर्वनियोजित सायकल पर्यटन केले. या तीन दिवसांत 450 किमी सायकलिंग केले. सुट्टी जास्त नसल्याने फक्त तीन दिवसांचे नियोजन केले होते. वेळ वाचवून व उन्हाची वेळ टाळून जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचणे आणि त्यासाठी सकाळी 5 वाजता सायकलिंग ला सुरुवात करणे एवढे नक्की केले. प्रत्येक दिवशी सरासरी 150 किमी सायकलिंग करणे शक्य असल्याने जातांना ठाणे-कसारा व परत येताना कसारा-ठाणे लोकल ट्रेन मध्ये सायकली घेऊन जायचे व यायचे असे नियोजन केले.

बुधवारी सकाळी पहिल्या कसारा ट्रेनमध्ये सायकलींसह कळवा येथून सकाळी सव्वापाच वाजता आम्ही प्रवास सुरु केला व कसारा स्टेशन ऐवजी महामार्गानजीक असलेल्या  उंबरमाळी स्टेशन ला 7 वाजता उतरलो व सायकलिंग सुरू केले.  एक तासानंतर  कसारा घाटाच्या पायथ्याशी पोहोचलो  . चहा नास्ता करून नंतर 40 मिनिटांत कसारा घाट पार केला. घाटाचे 774 मीटरचा चढ पार केल्यानंतर पाणी पिण्यासाठी घाटनदेवी मंदिरात थांबलो व दर्शन घेतले. इगतपुरी व घोटी पार करून सकाळी 10 च्या दरम्यान घोटी-सिन्नर रोडने सिन्नर कडे प्रवास सुरु केला. थोडे अंतर गेल्यानंतर लक्षात आले की रस्त्याची अवस्था अतिशय वाईट आहे. 55 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिन्नर ला दुपारच्या जेवणापूर्वी 1 वाजेपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात निघालो पण रस्त्यात जास्तच खड्डे असल्याने  आणि सायकल ला असलेले बरोबरचे सामान अंदाजे 15 किलो असल्याने माझे सहकारी श्री मिलिंद गोगटे याच्या सायकल चे कॅरिअर तुटले व सायकल पुढे चालवणे शक्य होईना त्यामुळे गती थांबली व रस्त्यात वेल्डिंग दुकानाचा शोध सुरू केला. साधारणतः 7 किमी अंतरावर एक वेल्डिंग चे दुकान मिळाले व सुदैवाने अतिशय कौशल्यपूर्वक काम करणारा वेल्डर तिथे असल्याने 10 मिनिटात नवी पट्टी जोडून कॅरिअर दुरुस्ती करून मिळाले. तोपर्यंत 11.30 वाजले होते व उन्हाचा चटका वाढला होता आणि सिन्नर अजून 40 किमी अंतरावर होते. सिन्नर ला दुपारचे जेवण करून तेथून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या डूबेर गावी जाऊन थोरले बाजीराव पेशवे यांचे जन्मस्थान असलेला ‘बर्वे वाडा’ पाहून व सिन्नर जवळील गोंदेश्वराचे दर्शन घेऊन पुढे जायचे होते. त्यामुळे जास्तीत जास्त गतीने सायकल चालवून लवकरात लवकर सिन्नर ला पोहोचणे गरजेचे होते. प्रचंड ऊन असल्याने व सायकल ची गती वाढवल्याने डिहायड्रेशन ची भीती होती म्हणून सोबत घेतलेले इलेक्टरल मध्ये मध्ये थांबून घेतले. सिन्नर पर्यंत तीन ठिकाणी ब्रेक घेऊन दुपारी  2.30 वाजता सिन्नर ला पोहोचलो. सिन्नर 10 किमी असतानाच प्रा. चंद्रशेखर बर्वे यांचा फोन आला ते जेवणासाठी संस्कृती हॉटेलवर आमची वाट पाहत होते. थोरले बाजीराव पेशवे ज्या वाड्यात जन्मले त्या वाड्याचे वारसाहक्काने मालक असलेले प्रा. चंद्रशेखर बर्वे हे अतिशय साधेपणा जपणारे, स्वतः सायकालिस्ट असलेले, मनमिळाऊ, वागण्या बोलण्यात कुठलाही बडेजाव नसलेले एक अभ्यासू   व्यक्तिमत्त्व.  गेली अनेक वर्षे ते न चुकता सायकलने पंढरपूर ची वारी करतात. मागच्याच महिन्यात पानिपत ते नाशिक अशी 1500 किलोमीटर ची सायकलिंग त्यांनी 9 दिवसात पूर्ण केली. सायकलिंग हा एक वेगळा असा समान धागा असल्याने त्यांनी एक सायकलिस्ट म्हणून आमचे मन:पूर्वक स्वागत केले . आम्हांला पुढे शिर्डीला त्याच दिवशी पोहोचायचे असल्याने आणि हे अंतर 60 किमी असल्याची माहिती असल्याने बर्वे सरांनी  पुढील दीड तासाचे नियोजन केले . जेवण करून सायकली हॉटेलला ठेऊन त्यांच्या कार ने आम्ही डूबेर ला थोरले बाजीराव पेशवे यांचे जन्मस्थान असलेला ‘बर्वे वाडा’ पाहण्यासाठी निघालो  . वाड्याकडे  जाण्याआधी गाडीत बसल्याबरोर 8 किलोमीटर प्रवासात बर्वे सरांनी  गावाविषयी व पंचक्रोशीविषयी माहिती दिली . यामध्ये गावाची रचना,लोकसंख्या, आजूबाजूचे किल्ले, डूबेररगड, पट्टा किल्ला, विश्रामगड  इत्यादींविषयी वर्णन होते. हे वर्णन संपण्याच्या आत आम्ही डूबेरला पोहोचलो. 

डुबेरे हे गाव सिन्नरच्या दक्षिणेला सात किलोमीटर अंतरावर आहे. एका बाजूला औंढा पट्टयांची रांग व दुस-या बाजूला सप्तशृंगी देवीचे मंदिर असलेला डुबेर डोंगर. त्‍या डोंगर पायथ्याशी दाट झाडीत डुबलेले गाव म्हणून गावाचे डुबेरे हे नाव. त्या परिसरात अजूनही पेशवेकालीन बैठी व दुमजली घरे आहेत. डुबेरे गावातील मुख्य गल्ल्या व बोळ; अरुंद रस्ते एकमेकांना समांतर व काटकोनात छेदणारे आहेत, हे विशेष. बर्वेवाडा गावाच्या मध्यभागी आहे.  323 वर्षापुर्वी हा वाडा  बांधला असल्याचे बर्वे सरांनी सांगितले. वाड्याचे बांधकाम भक्कम आहे. ते  चपट्या विटा व चिरेबंद घडीव दगड यांनी केलेले आहे. वाड्याला चहुबाजूनी तटबंदी आहे. वाड्यास एक टेहळणी बुरुज आहे. त्या बुरुजावरुन गावाचा पूर्ण परिसर नजरेत भरतो. या वाड्याची रचना समजून सांगतानाच संपूर्ण वाडा बर्वे सरांनी सोबत फिरून दाखवला आणि माहिती दिली. थोरले बाजीराव पेशवे  याचेविषयी देखील माहिती सांगितली. काही महिन्यांपूर्वी पर्यंत बर्वे सरांचे या वाड्यात सहकुटुंब वास्तव्य होते. सध्या कामानिमित्त ते सिन्नर ला राहतात पण वाड्याशी असलेली बांधिलकी त्यांनी जपलीय.  नियमित साफसफाई बरोबरच वाड्याची आवश्यक ती काळजी बर्वे सर घेतात. वाड्याविषयी सविस्तर माहिती सांगून झाल्यानंतर वाड्याच्या  बुरुजावर आम्हाला घेऊन गेले व सभोवतालच्या परिसराची भौगोलिक माहिती दिली आणि काही फोटो सुद्धा काढले.  त्यानंतर गावातील सटवाईच्या मंदिराला भेट दिली. त्याचबरोबर गावात असलेले 200 वर्ष जुने व अतिशय दुर्मिळ असे भोपळ्याचे झाड दाखवले व त्याविषयीची रंजक आणी शास्त्रीय  माहीत सांगितली. डूबेर भेट आटोपून  बर्वे सरांनी आम्हाला 4 वाजता निरोप दिला. आम्ही सिन्नर मधील दुसरे मह्त्वाचे ठिकाण गोंदेश्वर मंदिराकडे सायकलवर निघालो व 4.30 वाजता मंदिरात पोहोचलो.

सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर हे  सिन्नर या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे मंदिर आहे. 
पुरातन भूमिज स्थापत्यशैली बांधकामाचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर १२ व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. हे मंदिर १२५ फुट Χ ९५ फुट आहे. हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. यांतील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. मंदिरात सभामंडप व गाभारा आहे. गर्भगृहावर बांधलेले, आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंडी आहे. घाईतच मंदिर भेट व दर्शन आटोपून सायंकाळी सव्वापाच वाजता 60 किलोमीटर वर असलेल्या कोपरगाव या माझ्या गावी  नियोजित  मुक्कामाच्या ठिकाणी जायला निघालो.  कोपरगावला पोहोचण्यास रात्रीचे 8 वाजणार व बराच अंधार होणार असल्याने जास्तीत जास्त गतीने जावे लागणार होते. कोपरगाव हे माझे गाव असल्याने रस्ता महितीचाच होता म्हणून अंधार असला तरी चालणार होते. अखेर साडेसात वाजता एकूण 150 किलोमीटर सायकालिंग करून कोपरगाव ला माझ्या घरी पोहोचलो. 

दुसऱ्या दिवशी लवकर उठून सकाळी  6 वाजता शिर्डीला जाऊन आलो. सलगच्या सुट्टीमुळे साईबाबा च्या दर्शनासाठी  खूप गर्दी असल्याने मंदिराचे दूरदर्शन घेऊन आम्ही परत कोपरगाव च्या घरी आलो व नास्ता करून मालेगाव मुक्कामी निघालो. दुपारचे जेवण मनमाड जवळील कुंदलगाव  या बहिणीच्या  गावी केले. शेतात असलेल्या वस्तीवर मस्तपैकी चूलिवरची बाजरीची भाकरी, गावरान वांग्याची भाजी आणि सोबतीला मिरचीचा ठेचा असा जेवणाचा जोरदार बेत होता. जेवण करून शेतात फेरफटका मारला सर्व पिकांची माहिती घेतली.  भाच्याने शेततळ्यात केलेल्या मत्स्यशेतीच्या प्रयोगाची माहिती घेतली. तळ्यात असलेले रोहू त्याचबरोबर कटला या प्रकारातील मासे पाहायला मिळाले.  माझ्यासोबत असेलेल्या श्री गोगटे यांनी शेतात येथेच्छ फोटोग्राफी केली आणि आठवणी त्यांच्या कॅमेऱ्यात टिपल्या. कुंदलगावला एक तास विश्रांती घेऊन साडेचार ला मालेगाव ला जायला निघालो. कुंदलगाव ते मालेगाव उताराचा रस्ता असल्याने सव्वा तासातच मालेगाव गाठता आले. मालेगाव जवळ पोहोचताच मित्र डॉ शंकर कदम यांचा फोन आला व त्यांनी मालेगावातील  राष्ट्रीय एकात्मता चौकात ते आमची वाट पाहत असल्याचे सांगितले. तिथे पोहोचताच आम्ही आश्चर्यचकित झालो . डॉ शंकर कदम, डॉ राजेश निकम, वाघ सर  हे त्यांच्या मित्रांसह व मालेगावातील काही सायकल मित्रांसह ज्यामध्ये मालेगाव महानगरपालिकेचे दोन विद्यमान नगरसेवक सुद्धा होते आमच्या स्वागतासाठी हजर होते. ठाण्याहून सायकलने आल्याचे अप्रूप त्यांना वाटत होते. भर रस्त्यात असलेल्या  मोठ्या चौकात त्यांनी आमचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार केला. फोटोग्राफर सुद्धा हे क्षण टिपण्यासाठी सज्ज ठेवले होते. मला हा सत्कार म्हणजे आपल्या मित्रांनी केलेला आमचा  कौतुकसोहळा वाटला. सत्कार आटोपल्यानंतर गेस्टहाऊस ला मुक्कामाच्या ठिकाणी ते आम्हास घेऊन गेले. सर्वांसोबत सायकलिंग च्या गप्पा आणि अनुभवांची देवाणघेवाण झाली. अंघोळ करून फ्रेश होऊन सर्वांनी एकत्र चहा घेतला . रात्री लवकर जेवण आटोपून सकाळी साडेपाचला निघण्याच्या नियोजनासोबत झोपी गेलो.

दिनांक 21 फेब्रुवारी,  तिसऱ्या दिवशी मालेगाव ते थेट ठाणे असा प्रवास असल्याने आणि हे अंतर 250 किमी पेक्षा जास्त असल्याने 180 किलोमीटरवर असलेल्या कसारा स्टेशन पर्यंत सायकलिंग करून जाण्याचे  नियोजन केले. रात्री आठ वाजेपर्यंत कसारा घात पार करून  रात्री 9 वाजताच्या  कसारा ट्रेन ने ठाण्याला जायचे ठरवून साडेपाच वाजता मालेगावहून सायकलिंग सुरू केले. मालेगाव- चांदवड-नाशिक-कसारा असा 180 किलोमीटरचा प्रवास होता. त्यातील मालेगाव ते चांदवड हा 45 किलोमीटरचा टप्पा  सायकलिंग साठी  थोडा कठीण असा होता . यामध्ये 
मुंबई-आग्रा हायवेवरचा चांदवड तालुक्यात  तीव्र चढाव असलेला आणि तीव्र वळणे असल्याने  धोकादायक ठरलेल्या राहुड घाटातील रस्ता होता . हा रस्ता सहापदरी करण्यात आला असल्याने रुंदीकरणात अनेक वळणे गेली असली तरी   घाटाचा बाज कमी झालेला नाही. त्यामुळे कठडे, फलक, रॅम्बलर अशा महत्त्वपूर्ण सुविधा असूनही हा घाट धोकादायक मानला जातो. जवळजवळ 800 मीटर कठीण चढ असलेला  घाटरस्ता पार करून आम्ही 8 वाजता चांदवड ला पोहोचलो. चांदवड ला ग्रंथपाल असलेला मित्र दिलीप घोगरे आमची नाश्त्यासाठी वाट पाहत होता. महाशिवरात्रीच्या उपवासाचा विचार न करता येथेच्छ नास्ता केला आणि 9 वाजता नाशिककडे प्रस्थान केले. चांदवड पासून  64 किलोमीटर अंतर पार करून दुपारच्या जेवणासाठी नाशिक ला एक वाजता  माझ्या काकांच्या घरी पोहीचलो. एअर इंडियातुन यंत्र अभियंता म्हणून   निवृत्त झालेले, आणि सध्या नाशिक मध्ये संघाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमांचा भाग असलेले 65 वर्षीय काका स्वतः सायकल दररोज वापरत असल्याने त्यांनी आमचे अतिशय आपुलकीने  स्वागत केले मालेगाव ते नाशिक 107 किलोमीटर चा सायकल प्रवास सकाळी साडेपाच पासून केल्याने थोडा थकवा जाणवत होता म्हणून नाशिकला पोहोचताच अंघोळ करून जेवण केले आणि मी  थोडी विश्रांती घेतली व माझे सहकारी श्री गोगटे यांनी काकांनी केलेले बंगल्याचे व बागेचे नियोजन पाहत आणि काकांशी गप्पा मारत फोटोग्राफी करणे पसंत केले. नाशिक ला थांबलो होतो तिथून कसारा रेल्वे स्टेशन 70 किलोमीटर असल्याने अंधार होण्याचा विचार करून  चार वाजता कसाऱ्याला जाण्यासाठी निघालो. घोटीपर्यंत बऱ्यापैकी चढ असल्याने हवा तसा वेग घेता येत नव्हता. साडेसात वाजण्याच्या सुमारास अंधार पडल्यानंतर कसारा घाटात  पोहोचलो पण पूर्ण उतार असल्याने लवकरच घाट उतरून फूडपॉइंट हॉटेल ला  आठ वाजता पोहोचलो व जेवणाला पर्याय होईल असे खाऊन घेतले. कसारा लोकल ट्रेन चे वेळापत्रक तपासून 9.21 च्या कसारा गाडीने जायचे ठरवून कसारा स्टेशनवर पोहोचलो. स्टेशन वर श्री गोगटे यांच्या लक्षात आले की ही जलद गाडी आहे त्यामुळे कळवा किंवा मुंब्राला उतरता येणार नाही. मग आम्ही शहाडला  उतरून नंतर लगेचच असलेल्या टिटवाळा गाडीने मुंब्रा ला उतरलो आणि सायकलिंग करीत रात्री 11.30 वाजता  सायकलिंग पर्यटनाच्या संपन्न अनुभवासह घरी परतलो. शेवटच्या दिवसाची सायकलिंग 180 किलोमीटर झाली होती पण या पर्यटनाने खूप चांगला अनुभव दिला, खूप लोकांना भेटता आले, सायकलिंग चे फायदे लोकांना सांगता आले. पन्नाशीच्या पुढील दोन 'तरुण' एवढा सायकल प्रवास करू शकतात तर आपण का सुरू करू नये असा विचार काही लोकांनी बोलून दाखवला सुद्धा. विशेषतः माझ्या सोबतचे श्री मिलिंद गोगटे 58 वर्षाचे आहेत व त्यांना मधुमेह असल्याचे काही वर्षांपूर्वी निदान झालेले असतानाही त्यांनी  नियमित सायकलिंग ने मधुमेह सुद्धा पळवून लावला व अनेकदा तपासण्या करून डॉक्टरांनी त्यांना मधूमेहासाठी कोणत्याही औषधाची गरज नसल्याचे सांगितल्याचा अनुभव त्यांनी लोकांना सांगितला. काहींनी आता आम्ही निदान 15 किलोमीटर तरी सायकल नियमित चालवू असा शब्द सुद्धा आम्हाला दिला. या सर्व प्रवासात अनेकदा लोक स्वतः हुन सवांद साधत होते. थांबवून चौकशी करत होते, चहापाणी घेणार का अशी विचारणा ही काही लोकांनी केली.  प्रवासात कारचालक, दुचाकीस्वार स्वतःहून रास्ता देत होते. असा एकंदर खूप चांगला अनुभव आला. पण फक्त सायकल ने दूरचा  प्रवास करणाऱ्याचे कौतुक करण्यापूरता उत्साह न दाखवता लोकांनी स्वतः सायकल चा दैनंदिन वापर करावा अशी  माफक अपेक्षा आम्ही ठेऊन आहोत.

प्रा.नारायण बारसे
ठाणे

No comments:

Post a Comment