Monday, May 18, 2020

सायकलींग आणि सायकल सुरक्षा


सायकलींग आणि सायकल सुरक्षा
प्रा नारायण बारसे
जोशी-बेडेकर महाविद्यालय, ठाणे

दुसरे सायकल मित्र संमेलन ठाण्यात भरत आहे . या संमेलनात एक हौशी सायकलपटू म्हणून सहभागी होताना मला मनस्वी आनंद होत आहे. लहानपणापासून मी नियमितपणे सायकल चालवतो आहे माझ्या संपूर्ण शिक्षणप्रवासात सायकलने माझी साथ केली आहे . मी जिथे जिथे शिक्षणा साठी गेलो तेथे मी सायकल घेऊनच जात असे . त्या काळात मला सायकल सारखे सर्व दृष्टीने सौयीचे असे कोणतेही साधन वाटत नसे . पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर नोकरीच्या निमित्ताने प्रथम मुंबई आणि नंतर ठाण्यात स्थायिक झालो आणि माझी सायकलची साथ सुटली . तीन वर्षापुर्वी खूप वाढलेला कोलेस्ट्रोल चा स्तर, अनियमित रक्तदाब, नेहमीच १०० च्या जवळ राहणार पल्स रेट ९३ किलो वजन अशी अतिशय धोकादायक  आरोग्य स्थिती उद्भवल्यानंतर पुन्हा सायकल कडे वळलो आणि यातले बरेच आकडे पुन्हा सकारात्मक  बदलता आले व अतिशय आरोग्यदायी पद्धतीने ११ किलो वजन कमी केले . हे करत असतांना इतरांनाही सायकल चालवण्याचे फायदे सांगून सायकलिंग साठी तयार केले . महाविद्यालात देखील काही कर्मचारी आणि विद्यार्थी नियमितपणे सायकलने येताना दिसतात.

माझे घर आणि मी नोकरी करत असलेल्या जोशी-बेडेकर महाविद्यालयामधील  अंतर फक्त पाच किलोमीटर असल्याने मी  विशेषतः हिवाळ्यात अनेकदा सायकलने सायकलने महाविद्यालयात अजूनही जातो.  शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशी २५ किमी पेक्षा अधिक सायकलिंग हे नित्याचेच झाले आहे.  तीन वर्षात ९७०० किमी सायकल  चालवल्यानंतर माझी आवडती फायरफोक्स टार्गेट हि सायकल बदलून मी नोव्हेंबर २०१८ मध्ये स्कॉट सबक्रोस ४० हि सायकल खरेदी केली . नवीन सायकल सुद्धा दोन महिन्यात १५०० पेक्षा अधिक किमी वापरून झाली आहे . यावर्षी नवीन वर्षाची सुरुवात एक जानेवारीला ठाणे ते बदलापूर आणि परत असे एकून ७० किमी सायालिंग ने केली.  सायकल चालवणे हा माझा नित्य आनंदाचा एक भाग आहे . सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत . आजही जगाच्या अनेक भागात प्रवासाचे  महत्त्वपूर्ण साधन आहे.

सायकलचा इतिहास अतिशय रंजक आहे. सायकल या वाहनाच्या कल्पनेचे मूळ ज्याला म्हणता येईल असे वाहन एका  फ्रेंच गृहस्थाने १६७०  मध्ये प्रथम तयार केले एका दांड्याने जोडलेली दोन चाके इतकेच त्याचे मूळ स्वरूप होते या दांड्यावर दोन्ही बाजूंनी पाय सोडून बसून पायाने जमिनीला रेटा देतच हि सायकल  चालवावी लागे. आधुनिक सायकलला   रबरी टायर च्या शोधाने ने  खरी गती  आणली आणि सायकल विश्वात एक क्रांती घडून आली . पुढे रबरी नळीत हवा भरून ठेवलेले टायर  प्रचारात आले गती आणि सोय या दृष्टीने हवा भरलेले टायर सर्वांपेक्षा उत्तम ठरले त्यानंतर सायकल मध्ये अनेक प्रकारच्या सुधारणा घडून आल्या व आजची प्रगत स्वरूपातील सायकल आपल्या हाती आली.


सायकल तंत्रज्ञानाने जशी जशी प्रगती केली त्याप्रमाणे नवीन स्वरूपाचे आणि नवीन प्रकारच्या सायकली आपल्या हाती यायला सुरुवात झाली दोन चाकी, तीन चाकी सायकली, वजनाला हलक्या असलेल्या  सायकली, मालवाहू सायकली , लहान मुलांसाठी तीनचाकी सायकलीं असे  अनेक सायकल  प्रकार प्रचलित झाले.  उत्तरेकडील राज्यात प्रवासी वाहन म्हणून  वापरल्या जाणाऱ्या  तीन चाकी सायकली बरोबरच एक चाकी सायकल दुचाकी सायकल शर्यतीची सायकल घडीची सायकल, स्त्रियांसाठीची ची सायकल   अपंगाची सायकल अशा विविध प्रकारच्या  सायकली बरोबरच स्वयंचलित सायकली  देखील आता बाजारात  उपलब्ध आहेत.

सायकलवरून कमीत कमी वेळेत  अंतर कापण्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा जगभर सर्वत्र प्रचलित आहे विशेषतः युरोप, इंग्लंड ,कॅनडा ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड अमेरिका, जपान, वेस्टइंडीज इत्यादी ठिकाणी सायकल शर्यतीचे खूप लोकप्रिय प्रकार आहेत या सायकल स्पर्धांची  सुरुवात साधारण १९ व्या शतकाच्या उत्तरार्धांत झाली. फ्रान्समधील टूर डी फ्रान्स ही जगातील सर्वात लोकप्रिय  सायकल शर्यत असून  अनेक  स्पर्धेक या स्पर्धेत  भाग घेऊन युरोपमधून ठरावीक अंतर पार करतात . रस्त्यावरील सायकल स्पर्धाबरोबरच धावपट्टीवरील सायकल शर्यती, सायकलॉक्रॉस स्पर्धा, पर्वतराजीतील सायकल मोहिमा इत्यादी सायकल संबंधित साहसी  खेळ प्रकार सध्या प्रचलित आहेत.

सायकल विकसित झाल्यानंतर सायकलिंग साठी  इतर सहाय्यक साहित्यसुद्धा विकसित करण्यात आले त्यामध्ये सामान ठेवण्याची कॅरिअर, साखळी वरचे आवरण, हवा भरण्याचा पंप, आधुनिक सायकलिंग सोबत पाणी बॉटल होल्डर , सायकलिंग साठी पाणी बॉटल, सायकल चालवताना आवश्यक असलेले हेल्मेट, हाताला सुरक्षा मिळावी म्हणून हॅन्डग्लोज इत्यादी साहित्य विकसित केले आहे. 

सायकल शर्यती हा जसा साहसी   स्पर्धात्मक क्रीडाप्रकार आहे तसाच तो फावला वेळ उत्तम रित्या घालवण्याचा व व्यायामदायी   असा प्रकार आहे.  केवळ मौजेखातर सायकल फिरवणे व सायकल सहली काढणे यांचाही यामध्ये  समावेश होतो. सुट्टीचा एखादा दिवस शहराबाहेर  निसर्गरम्य वातावरणात सायकल चालवणे किवा  सायकल वरून दूरवरचा प्रवास अशी सायकलस्वारांना आनंद देणारे सायकलिंग चे  प्रकार आहेत. काही सायकल प्रेमी सायकलवरून हिमालयाच्या पर्वत रांगांची सफर करणे हा एक साहसी व रोमहर्षक असा क्रीडाप्रकार करतात. हिमाचल प्रदेशातील सायकल मोहिमा व  लडाखमधील सायकल स्वारीचा अनुभव जास्त चित्तथरारक ठरू शकतात. हिमाचल प्रदेशातून उत्तरांचलात जाणारा डोंगराळ प्रदेशातील खडतर मार्गही सायकलपटूना आकृष्ट करणारा आहे.  

सायकल वापरण्याचे फायदे अनेक आहेत. आधुनिक काळात  डॉक्टर रुग्णाने सायकल चालवावी असा सल्ला देतात. सायकल चालविण्याने रक्तभिसरण होण्यास मदत तर होतेच परंतु मूळ चयापचय क्रियेसाठी सायकल चालवण्याचा व्यायाम पोषक असतो.  बैठी कामे करणाऱ्याच्या  पायांच्या स्नायुंना सायकलमुळे व्यायाम मिळून जादा असलेली  चरबी कमी होते.  मोकळ्या हवेत सायकल चालविण्याने शरीराला ऑक्सिजनचा  जास्त पुरवठा होऊन दीर्घश्वसन होते.  एकाच जागी स्थिर राहून सायकल चालवण्यासाठी  म्हणून मोठ्या व्यायामशाळांमध्ये सायकल यंत्रे उपलब्ध असतात. सायकल अतिशय सोपा व्यायाम प्रकार आहे. सायकल कधीही व कुठेही चालवता येते. या व्यायामासाठी जास्त खर्च येत नाही सर्व खेळाडूंसाठी उत्तम व्यायाम प्रकार आहे शरीराला दुखापत कमी होते. सायकल हा एरोबिक्स व्यायाम प्रकार आहे ज्यामध्ये कमीत कमी ताण पडतो व दुखापत कमी होते. वजन नियंत्रित राहण्यास मदत होते आणि वजन लवकर कमी होते.

सायकल चालवण्याचे अनेक फायदे आपणास सांगितले जात असले तरी सायकल चालवताना  खूप खबरदारी घेणे गरजेचे आहे . सायकल सुरक्षा हि अतिशय महत्वाची असून सायकल सुरक्षेचा प्राधान्याने विचार करायला हवा.  सायकल शहरात चालवयाची असो व   शहराबाहेर सुरक्षेच्या दृष्टीने काही गोष्टी ध्यानात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.  

 सायकल सुरक्षेच्या दृष्टीने काही   नियम हे अंगीकारणे, आत्मसात करणे आणि त्याचा योग्य प्रकारे वापर करणे अतिशय महत्त्वाचे आहे. सायकल चालवताना चालवणार्‍यांच्या सुरक्षेसोबतच रस्त्यावर चालणार्‍या पादचार्‍यांची सुरक्षा महत्त्वाची आहे हे आपण ध्यानात घ्यायला हवे .  सर्वात महत्वाचे म्हणजे सायकल चालवतांना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. बर्याच वेळा सायाकाल्चालक सिग्नल जणू आपल्यासाठी नाहीच अशा अविर्भावात सिग्नल लाल रंगाचा असतांना सुद्धा सायकल दामटत असतात. एक जबाबदार नागरिक म्हणून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सायकलचा वापर करताना जबाबदारीने सायकल चालवणे देखील गरजेचे आहे. सायकल चालवताना हेल्मेट चा वापर आवश्यक आहे.

सायकल सुरक्षेच्या दृष्टीने अनेक प्रकारचे सायकल साहित्य आणि सायकल सुरक्षा साहित्य सध्या बाजारात  उपलब्ध आहे आपल्या आवश्यकतेनुसार आणि आपण ज्या प्रकारच्या सायकल प्रकारांमध्ये जास्त रुची ठेवून आहोत त्या सायकल प्रकाराला साजेसे असे साहित्य सायकल सुरक्षा साहित्य म्हणून आपण घ्यायला हवे. यामध्ये खालील प्रकारचे साहित्य बाजारात  सध्या उपलब्ध आहेत ते आपल्याला सायकल सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय आवश्यक  आहे असे वाटते. सर्वसाधारणपणे सुरक्षेच्या दृष्टीने पुढील सायकल सुरक्षा साहित्याचा गरजेनुसार आपण वापर करणे गरजेचे आहे.  सायकल हेल्मेट सायकल लाइट सायकल टन सिग्नल सायकल फ्लाय कॅमेरा टॉर्च बायसिकल हेल्मेट हॅलो बेल्ट फायर फ्लाय बाईक रेस फायबर प्लेयर लाईट ऑफ फार्म बंड लाऊड बायसिकल हॉल सायकलिंग ब्लाऊज बायसिकल नेव्हिगेशन किट हँडल बँड
यामध्ये प्रामुख्याने लाईट , हेडलाईट, रिफ्लेक्टर, सिग्नल लाईट , होर्न, घंटी, हेल्मेट, सायकल आरसा, हंड्लोव्स, पाणी बॉटल होल्डर ,  सायकलिंग साठी पाणी बॉटल, सायकलिंग साठी कपडे (shorts, T Shirts, knee.cap )सायकलिंग साठी चा चष्मा, बूट  इत्यादी मूलभूत गोष्टी सायकल  सुरक्षेच्या दृष्टीने  महत्त्वाचच्या  आहेत.   

सायकल चालवण्यासाठी बाहेर पडनण्यापुर्वी  काही गोष्टी आपण सायकल सुरक्षेच्या दृष्टीने जरूर तपासून घ्याव्या. सायकलवर बसण्यापूर्वी सायकलच्या दोन्ही टायर मध्ये पुरेशी हवा आहे की नाही आणि ब्रेक्स नीट काम करत आहेत की नाही याची खात्री करून घेणे स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी महत्वाचे आहे . शहरात सायकल चालवताना सायकल आरसा लावल्यास त्याचा चांगला उपयोग होऊ.  ज्या  दिशेने वाहने  जातात  त्याच  दिशेने सायकल सायकल चालवावी  . सायकल चालवतांना हेडफोनद्वारे  गाणी ऐकणे किंवा फोनवर बोलणे टाळावे . अश्याप्रकारे फोनवर बोलण्याने रास्तावाहातुकीकडे दुर्लक्ष होऊन अपघाताला निमंत्रण मिळू शकते .  आपल्याकडे शहरांमध्ये सायकलींसाठी वेगळी रस्ते किंवा नाही त्यामुळे रस्त्याच्या डाव्या बाजूने किंवा सर्विस रोड वरून सायकल चालवणे योग्य.  साधारणपणे मोठ्या गाड्यांच्या अतीशय जवळून सायकल चालू नये त्याचप्रमाणे  फुटपाथवरून सायकल कधी चालू नये. सायकल चालवताना रस्त्यामध्ये अचानक थांबू नये तसेच गरज पडल्यास हात वर करून मागच्या वाहनांना सूचना देऊन  सायकल एका बाजुला घ्यावी.  सायकलचे पार्किंग नेहमी रस्त्याच्या कडेलाच करावे त्यासाठी सायकल थांबा  असल्यास उत्तम.  दोनपेक्षा जास्त सायकलस्वारांनी समांतर रेषेत सायकल चालू नये.

आपण घराबाहेर दूरच्या ठिकाणी सायकलिंग करत जाणार असाल तर सायकलिंग ला निघण्यापूर्वी सायकलचे सर्व भाग व्यवस्थित आहेत की नाही याची खातरजमा करून देणे आवश्यक आहे एखादा भाग निकामी झाला असेल की होण्याच्या मार्गावर असेल तर तो नवीन बदलून घ्यावा. दूरच्या प्रवासात सायकलिंग साठी असलेले विशेष कपडे वापरावे. सायकलिंग साठी बाहेर पडतांना शक्यतो अनावश्यक समान सोबत घेऊ नये. समान असल्यास  मागच्या बाजुला व्यवस्थित बांधलेले असावे जेणेकरून वेगात खराब रस्त्यावरून जाताना ते पडणार नाही.  सायकलिंग करत असताना फोटोग्राफी करणे टाळावे.  सायकल चालवताना शक्यतो चांगल्या रस्त्यावरून चालवावी . रस्त्यावरील  खड्ड्यामुळे  तुम्हाला शारीरिक इजा होऊ शकते आणि सायकल देखील  खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सायकलिंग करताना वरील सूचना लक्षात ठेवल्यास सायकलिंग खऱ्या अर्थाने आणणाददायी होऊ शकते

No comments:

Post a Comment